कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २६ ऑक्टोबर-

कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान क्रीडा क्षेत्रावर झाले आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. राज्यातील शाळा सुरू झाल्या. आता शालेय क्रीडा स्पर्धा लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी सोलापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे शहर सचिव प्रा. संतोष खेंडे यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, गेल्या दीड वर्षापासून खेळाची मैदाने बंद असल्यामुळे खेळाडूंचा सराव बंद आहे. कोणत्याही प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धा न झाल्याने सर्व वयोगटातील खेळाडूंचे खूपच नुकसान झालेले आहे. स्पर्धा नसल्यामुळे १४ वर्ष वयोगटातील खेळाडू १७ वर्ष वयोगटात, १७ वर्ष वयोगटातील खेळाडू १९ वर्ष वयोगटात तर १९ वर्ष वयोगटातील खेळाडू वरिष्ठ वयोगटात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना या दोन वर्षात संधी होती. या कोरोनाच्या महामारीमुळे ती संधीदेखील हुकली आहे. म्हणून इनडोअर व आऊटडोअरच्या सर्व खेळांच्या स्पर्धा सुरू कराव्यात, जेणेकरून खेळाडूंचे नुकसान होणार नाही.
कोरोनाच्या काळात सर्वांनाच प्रतिकारात्मक शक्ती (इम्मुनिटी पॉवर) वाढविण्यासाठी व्यायामावर जास्त भर दिला गेला होता. त्यामुळे विविध खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा व्यायाम होत असतो. यामुळे खेळाडू शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी ,आनंदी ,तंदुरुस्त राहतात. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या संचमान्यतेमधील शासनाला दिलेल्या प्रस्तावात शारीरिक शिक्षण शिक्षक पद निश्चितीचे निकष अत्यंत चुकीचे व दिशाभूल करणारे असून, यामध्ये सुधारणा करून शुद्धी पत्रकाद्वारे योग्य निकष प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. २५० विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक हा निकष पदनिश्चितीमध्ये प्रस्तावात घ्यावा. तसेच महाराष्ट्र राज्यात शारीरिक शिक्षक भरती पूर्ण क्षमतेने करावी. जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी शालेय व संघटनेच्या सर्व स्तरावरील स्पर्धा सुरू कराव्यात. अशी मागणीही संतोष खेंडे यांनी केली आहे.

संतोष खेंडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact