– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी यांच्याकडून बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचा आढावा
सोलापूर, दि. 3 फेब्रुवारी, कन्या न्यूज सेवा: आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात स्त्री-पुरुष गुणोत्तर एक हजार पुरुषामागे 962 स्त्रिया तर नवजात मुलामुलींचे गुणोत्तर एक हजार मुलांमागे 960 मुली इतके असल्याचे दिसून येते. जिल्ह्याचे स्त्री पुरुष गुणोत्तरात अधिक वाढ होण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सच्या माध्यमातून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात प्रबोधन मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( महिला व बालकल्याण) जावेद शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. खोमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व अन्य सदस्य उपस्थित होते.
जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या सर्व विभाग प्रमुखांनी बेटी बचाव बेटी पढाओ योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रबोधन करावे. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना मुलीचे महत्त्व पटवून द्यावे व मुलगा-मुलगी असा कोणताही भेद न करण्याबाबत मतपरिवर्तन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.
लिंगनिदान प्रतिबंधासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची नियमित तपासणी केली जाते त्याबाबतचा तपासणी अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी लिंगनिदान होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी डिकोय केसेस कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले. तसेच या अनुषंगाने सर्व आरोग्य कर्मचारी व इतर अनुषंगिक कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे, असेही त्यांनी निर्देशित केले. यावेळी ‘सुरक्षित बालिका प्रबोधित बालिका’ अभियानातर्गत महिला व बालविकास विभागाने केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.
जिल्ह्यात 24 जानेवारी रोजी बालिका दिन साजरा करण्यात आलेला असून जिल्हा परिषदेच्या वतीने सुरक्षित बालिका प्रबोधित बालिका हे अभियान राबवून ग्रामीण भागातील नागरिकांचे बेटी बचाव बेटी पढाओच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी दिली. तसेच जिल्ह्यात बाल विवाह होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय चालकांनी की विवाहासाठी मंगल कार्यालयाची नोंदणी करताना संबंधित वर व वधू चे वय पूर्ण असल्याची कागदपत्रे चेक करूनच नोंदणी घ्यावी व बालविवाह रोखण्याच्या प्रशासनाच्या कामात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त कैलास आडे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले व अशासकीय सदस्य श्रीकांत गायकवाड, मुकुल शिंदे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी 21 डिसेंबर 2021 रोजी च्या बैठकीचे इतिवृत्त, पोलिस विभागाकडील तपासावरील प्रलंबित प्रकरणे, न्यायप्रविष्ट प्रकरणे व अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने असलेली प्रकरणे याबाबतचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.