कन्या न्यूज सेवा; सोलापूर, दि. २७ ऑक्टोबर-
भारत निवडणूक आयोगाकडून दि. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. १३ व १४ नोव्हेंबर २०२१, दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२१ रोजी शनिवार व रविवार विशेष मोहिमाच्या तारखा जाहीर झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, विशेष मोहिमेच्या दिवशी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणी, दुरुस्ती व वगळणीबाबतचे अर्ज स्वीकारणार आहेत. त्या अनुषंगाने, ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही अशा सर्व नागरिकांनी दि. १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांनी विशेष मोहीमेच्या दिवशी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून मतदार नोंदणी करून घ्यावी किंवा www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक त्या पुराव्यासह मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज करावा.
मतदार नोंदणीबाबत अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांक १९५० यावरती संपर्क साधावा असे, आवाहनही वाघमारे यांनी केली आहे