कन्या न्यूज सेवा, सोलापूर, दि. ६ फेब्रु वारी :  पंढरपूर शहरातील चंद्रभागेच्या पात्रात सद्यस्थितीत अतिशय घाण पाणी आढळून येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासुन याच घाण पाण्यात वारकरी भाविक स्नान करत आहेत. परंतु या प्रश्‍नाकडे प्रशासकीय अधिकार्‍यांसह स्थानिक नेतेमंडळींनी दुर्लक्ष केल्याने महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे. ‘‘त्वरीत या प्रश्‍नाकडे लक्ष देऊन चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडावे अन्यथा त्याच घाण पाण्याने प्रशासकीय अधिकार्‍यांना आंघोळ घातली जाईल!‘‘ असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

पंढरपूर शहरातील चंद्रभागेच्या पात्रात सद्यस्थितीत अतिशय घाण पाणी आढळून येत आहे.

चंद्रभागेच्या पात्रात साठून राहिलेल्या घाण पाण्यावर सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव वाढला असून व पाण्यावर शेवाळं साठलेले आहे तसेच पाण्यात आळ्या झाल्या आहेत. चंद्रभागेच्या तीरावर सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. जगातील सर्व तिर्थाहून मोठे तिर्थस्थान अशी ओळख असलेल्या मातेसमान चंद्रभागा नदीचे हे ओंगळवाणे रुप उघड्या डोळ्यांनी पहावत नाही. विविध वारकर्‍यांच्या संघटनाही यावर मुग गिळून गप्प आहेत. वारकरी संघटनांचे नेतृत्व करणार्‍या महाराज मंडळींना चंद्रभागेची महती काय फक्त अभंगामध्येच दिसतेय का? असा प्रश्‍न उपस्थित करुन गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागा नदी पात्राच्या या दुरावस्थेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या अनेक भाविक चंद्रभागेच्या याच दुषित पाण्यात आंघोळ करत आहेत. त्यामुळे अनेकांच्या अंगाला खाज सुटणे, त्वचेचे विकार जडल्याची उदाहरणे समोर येत आहेत. नमामी चंद्रभागा फक्त कागदावरच असून या प्रश्‍नाकडे स्थानिक नेते मंडळींसह वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष का? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. चंद्रभागेच्या पात्रात उजनी धरणातुन त्वरीत पाणी सोडावे अन्यथा महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact