कन्या न्यूज सेवा: सोलापूर, दि. २१ ऑक्टोबर-
सोलापूर स्थानिक पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करून मंगळवेढ्यातील दरोडा व सांगोल्यातील खूनाचा तपास काही महिन्यांनंतर लागलेला नाही. गुन्ह्यांचा तपास लागत नसल्याने गुन्हेगार हे मोकाट आहेत. त्यामुळे या दरोडा आणि खूनाचा तपास करून आरोपीला जेरबंद करण्याची जबाबदारी आता एका स्वतंत्र टीमकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली.
मंगळवेढा येथे डीवायएसपी कार्यालयाच्या वार्षिक तपासणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्विनी सातपुते रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रशासनात अनेक बदल केले. या बदलामुळे पोलिसांचे कामकाज अधिक गतिमान झाले आहे. सातपुते यांनी प्रलंबित गुन्हे निकाली काढण्याबरोबर शिक्षेचे प्रमाण वाढावे यावर भर दिला आहे. मंगळवेढा व सांगोला या पोलीस ठाण्याच्या गुन्हे पेन्डन्सीचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असून, ते २५ ते ३० टक्के पर्यतखाली आले पाहिजे, असे त्यांनी सूचित केले आहे.