कन्या न्यूज सेवा: सोलापूर,दि. 27 ऑगस्ट2021-
अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत मॉडर्न हायस्कूलच्या कृतिका किणीकरने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा द्वितीय-2021 या स्पर्धेत मॉडर्न हायस्कूल, कॅम्प, सोलापूर मधील कृतिका कृष्णात किणीकर (इ. १०वी) हिने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावून ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी टॉनिक ठरेल अशी आगळीवेगळी स्पर्धा गेली दोन वर्षे आयोजित केली जात आहे.
ही स्पर्धा अपूर्णांकाचे पाढे १०० पर्यंत म्हणण्याची असते. म्हणजेच पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्रे (वर्ग) १०० पर्यंत. ही स्पर्धा जिल्हा व राज्य पातळीवर आयोजित केली जाते.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. के.के.कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ.अरुणा कुलकर्णी, पर्यवेक्षिका रागिणी म्हैसकर आणि सर्व शिक्षकवृंदाने कृतिकाचे आणि तिला मार्गदर्शन करणाऱ्या सहशिक्षिका विजया देशपांडे यांचे कौतुक केले आहे. याचा बक्षीस समारंभ दि.६ सप्टेंबर रोजी मंत्रालय (मुंबई) येथे पार पडणार आहे.

