नवी दिल्ली येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कन्या न्यूज सेवा : सोलापूर, दि. १२ जून :

केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत (२०२०-२१)’ सोलापूर जिल्ह्याला प्रशस्तीपत्र श्रेणीत (लेटर ऑफ ॲप्रिसिएशन) पुरस्कार जाहीर झाला होता. नवी दिल्ली येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            कौशल्य विकासाबाबत उल्लेखनीय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकासचा पुरस्कार जाहीर झाला होता. सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने कोरोना काळात बेरोजगारांचा ऑनलाईन रोजगार मेळावा घेऊन हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.

सोलापूरसह सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक स्तरावर 30 जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम आणि ठाणे या पाच जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता.  पुरस्कारामध्ये  सातारा आणि सिंधुदुर्ग (अवार्ड फॉर एक्स्लन्स), वाशिम आणि ठाणे (सर्टिफिकेट ऑफ एक्स्लन्स) तर सोलापूर (लेटर ऑफ अप्रेंसिएशन) याप्रमाणे पुरस्कार जाहीर झाले होते.

देश पातळीवर या पुरस्कार स्पर्धेत देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. राष्ट्रीय सादरीकरणाकरीता झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक, सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येतो. हा आराखडा सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला होता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *